मतदारांना विषय समजावून मतपत्रिकेवरील क्रमांक व चिन्ह स्पष्टपणे सांगत थेट संवाद
सांगोला – नगरपालिका निवडणुकीची धग दिवसेंदिवस वाढत असताना आता प्रचार युद्धात सर्वच नेते थेट मतदारांपर्यंत पोहोचू लागले आहेत. विशेषतः आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती आबा बनकर तसेच शहरविकास आघाडीच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ स्वतः मोर्चा उघडला आहे.
शहरातील गल्ली-बोळ, चौका-चौकांमधून आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख हे थेट नागरिकांशी संवाद साधताना दिसत आहेत. यावेळी ते सांगोला शहर विकास आघाडीची भूमिका, विकास आराखडा, महत्त्वाचे विषय आणि येणार्या निवडणुकीतील प्राधान्यक्रम याची नागरिकांना सविस्तर माहिती देत आहेत.
विशेष म्हणजे, मतदारांना समजेल अशा भाषेत ते मतपत्रिकेवरील अनुक्रमांक, उमेदवारांचे नाव व त्यांचे निवडणूक चिन्ह अगदी तपशीलवार सांगून प्रत्यक्ष पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत. आपल्याला मतदान करताना आपल्या उमेदवाराचे चिन्ह कोणते, कोणते बटन दाबायचे, कोणते चिन्ह शोधायचे आणि शहराच्या विकासासाठी योग्य उमेदवार निवडण्याची जबाबदारी किती महत्त्वाची आहे हे ते प्रत्येक भेटीत स्पष्ट करत आहेत.त्यांच्या या थेट व जमिनीवरच्या संवादामुळे सांगोला शहरविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दुणावला असून अनेक प्रभागांत गतीमान वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणूक जवळ येत असताना सर्वच पॅनेल्स पूर्ण ताकदीने प्रचार करत असले तरी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या सक्रिय सहभागामुळे भाजप,शेतकरी कामगार पक्ष व दीपक आबा सांळुंखे पाटील गट यांच्या अधिकृत सांगोला शहर विकास आघाडीच्या प्रचाराला मोठी उभारी मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
संबंधित बातम्या




