CSK M S Dhoni Ipl Retirement : भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याने आयपीएलमधील निवृत्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने बुधवारी 7 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. रोहितने घेतलेल्या या अशा निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागला. रोहितकडून कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीची कुणाला अपेक्षाही नव्हती. मात्र त्यानंतरही हिटमॅनने घेतलेल्या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला. त्यानंतर काही तासांनी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने निवृत्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. चेन्नईने बुधवारी कोलकाता नाईट्स रायडर्सवर मात करत आयपीएलच्या 18 व्या मोसमातील तिसरा विजय मिळवला. महेंद्रसिंह धोनी याने सामन्यानंतर निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली.
मी करियरमध्ये शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र सध्या निवृत्ती घेण्याबाबत कोणताही विचार नाही. तसेच मी निवृत्तीबाबत वेळेनुसार निर्णय घेईन, अशी महेंद्रसिंह धोनी याने निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली. कोलकाताने चेन्नईला विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं होतं. सीएसकेने ते आव्हान 2 चेंडूंआधी 2 विकेट्स राखून पूर्ण केलं. चेन्नईने 19.4 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 183 धावा केल्या. चेन्नईसाठी शिवम दुबे याने सर्वाधिक डेवाल्ड ब्रेव्हीस याने सर्वाधिक 52 धावा केल्या. तर शिवम दुबे याने 45 रन्स केल्या. युवा उर्विल पटेल याने 31 धावांची निर्णायक खेळी केली. तर धोनीने नाबाद 17 धावा करत सीएसकेला विजयापर्यंत पोहचवलं.
महेंद्रसिंह धोनी काय म्हणाला?
“हेच प्रमे आणि स्नेह मला कायम मिळत राहिलंय. हे विसरु नका की मी 43 वर्षांचा आहे. मी बराच काळ खेळलो आहे.त्यापैकी अनेकांना माहित नाही की माझा शेवटचा सामना केव्हा असेल. त्यामुळेच ते येऊन मला खेळताना पाहू इच्छितात”, असं धोनीने हसत म्हटलं.
“मी माझ्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे, हे सत्य नाकारता येत नाही. आयपीएल संपल्यानंतर मला 6 ते 8 महिने कठोर परिश्रम करावे लागतील आणि माझं शरीर या दबावाचा सामना करु शकतो की नाही, हे पाहाव लागेल. अद्याप काहीही निश्चित झालेलं नाही. मात्र मी पाहिलेले प्रेम आणि ही आपुलकी उल्लेखनीय आहे”, असं म्हणत धोनीने त्याच्या चाहत्यांचं कौतुक केलं.
चेन्नईचं आयपीएल 2025 मधून पॅकअप
दरम्यान चेन्नईचं बऱ्याच सामन्यांआधी आयपीएल 2025 मधील आव्हान संपुष्ठात आलं आहे. चेन्नईने आतापर्यंत या मोसमात 12 सामने खेळले आहेत. चेन्नईला त्या 12 पैकी फक्त 3 सामन्यांतच यशस्वी होता आलं आहे. चेन्नई 6 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी अर्थात दहाव्या स्थानी आहे.