तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Chandrakant Patil Kolhapur Speech : महायुतीत एकत्र असल्यामुळे आम्ही एकमेकांवर टीका करायचं नाही असं ठरवलं आहे, पण मुश्रीफांनी जर टीका केलीच मी कशी टीका करतो हे माहिती आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोल्हापूर : राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू दे, तिजोरीचा मालक आपल्याकडे आहे असं वक्तव्य भाजपचे मंत्री चंद्रकात पाटील (Chandrakant Patil)  यांनी केलं. तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका असंही ते म्हणाले. गडहिंग्लजमधील प्रचारसभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.

राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत, कुणाला निधी द्यायचा आणि कुणाला नाही हे आपल्या हाती असल्याचं वक्तव्य नुकतंच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केलं होतं. त्यावरुन आता चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.

Chandrakant Patil Speech : तिजोरीचा मालक आमच्याकडे

राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा देतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की,“विरोधक म्हणतील की त्यांच्या हाती राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरी त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही, आणि जर का ती उघडली तर त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे.”

विरोधकांकडे एक मंत्री असले तर आम्ही इकडे दोन मंत्री आहोत. आम्ही महायुतीत असल्यामुळे एकमेकांवर टीका करायचे नाही असं ठरवलं आहे. आतापर्यंत हसन मुश्रीफ यांनी आपल्यावर टीका केली नाही. पण त्यांनी टीका केली तर मी कशी टीका करतो हे तुम्हाला माहिती आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Ajit Pawar On Fund : अजित पवार काय म्हणाले होते?

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी धाराशिवमध्ये गेलेल्या अजितदादांनी निधीसंबंधी एक वक्तव्य केलं होतं. माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे. माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभा राहिलात तर बातमीसारखा विकास तुमच्याकडे करू शकतो. अर्थमंत्री म्हणून याकडे बारकाईने लक्ष देईन असं अजित पवार म्हणाले होते.

अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. दादांच्या हाती राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असल्याचं राष्ट्रवादीचे नेते सांगू लागले. त्यावरच चंद्रकांत पाटलांनी आता वक्तव्य केलं आहे.

आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी बारामतीत केलेल्या वक्तव्यावरुनही चर्चा झाली. विरोधात उभा राहून निवडून आलेल्या उमेदवाराला नंतर निधी मिळाला नाही तर काय? असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. तुम्ही काट मारली तर मीही काट मारणार, असं वक्तव्यही अजित पवारांनी या भाषणात निधीच्या मुद्द्यावरून केलं होतं. त्यावेळी निधीवरून बोलताना दादांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon