नाशिक, 12 फेब्रुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सन २०२५-२६ साठीचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर केला. या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेत खा. राजाभाऊ वाजे यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यात शेतकरी ते सिहस्थ कुंभमेळा आणि नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे आदीबाबत खा. वाजे यांनी प्रश्न उपस्थित करून सरकारला या प्रश्नांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे
भारत हा शेतीप्रधान देश आहे. परंतु शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून बदलते हवामान, मालाचा अस्थिर भाव यामुळे शेतकरी अडचणीत आल्याचे मतं यावेळी खा. वाजे यांनी आपल्या संसदेतील भाषणात मांडले. त्यासोबतच नाशिक जिल्हा हा कांदा आणि द्राक्ष निर्यात करणारा जिल्हाआहे. मात्र, तब्बल २० टक्के निर्यात कर लादल्यामुळे आणि आगामी काळात येऊ घातलेल्या बंपर पिकामुळे कांद्याचे दर घसरून शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेत तात्काळ निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी खा. वाजे यांनी केली.
यासोबत, शेतीसाठी लागणारे खते, किटकनाशके यांच्यावरील जीएसटीमुळे त्यांचे दर गगनाला भिडले असून त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढून मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे किटकनाशके व खते यावरील जीएसटी कमी करावा किंबहुना रद्दच करावा अशी मागणी खा. राजाभाऊ वाजे यांनी आपल्या भाषणात केली. तसेच, शेतमालाचा अस्थिर भाव देखील शेतकऱ्याची आर्थिक स्थिती कमजोर करण्यासाठी कारणीभूत असल्याने हमीभाव देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.