कोकण, मध्य महाराष्ट्रत पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात १३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.

राज्यात यंदा मान्सून वेळआधी दाखल झाला. मे महिन्यात मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर जून महिन्यात काही दिवस पावसाने ओढ घेतली होती. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात सर्वत्र पावसाने जोर धरला आहे. आता आगामी पाच दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कोकणात पाच दिवस मुसळधार

कोकण, मध्य महाराष्ट्रात १३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात ९ जुलैनंतर पावसाचा जोर असणार आहे. त्यानंतर पाऊस कमी होणार आहे. यंदा राज्यात मराठवाडा आणि विदर्भ वगळता सर्वत्र पावसाने सरासरी गाठली आहे. कोकणात ७ जुलैपर्यंत १०३ टक्के पाऊस झाला आहे. नाशिकमध्ये १०२ तर पुण्यात १०१ टक्के पाऊस झाला आहे. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरात पावसाची तूट आहे. नागपूरमध्ये सरासरीच्या ८४ टक्के तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरीच्या ७६ टक्के पाऊस झाला आहे.

मराठवाड्यात पावसाची आवश्यकता

मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. जून महिन्यात वार्षिक सरासरी १६० मि.मी. पाऊस होणे अपेक्षित असताना ७९ मि.मी. पाऊस झाला आहे. मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यात साधारण ८५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत मोठा पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहू शकते. मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये ४६ टक्के जलसाठा आहे. जायकवाडी प्रकल्पात ५५ टक्के जलसाठा झाला आहे. नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात सध्या २३ टक्के जलसाठा आहे.

धरणांमध्ये जलसाठा वाढला

पुण्याच्या भीमाशंकर घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे चास कमान धरणातील जलसाठा ८० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. चाकण धरणातून १८०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास भिमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग अजून मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार आहे.

देशातील या भागांत जोरदार पाऊस

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पूर्व भारतात मुसळधार पाऊस होणार आहे. त्याचा परिणाम हा आपल्या राज्यात पाहायला मिळणार आहे. सध्या गुजरात, मध्य प्रदेश, छत्रीसगडमध्ये अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातच्या नवसारीमधील पुर्णा नदीला पूर आला आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon