अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, हसन मुश्रीफ यांनीच केली घोषणा; महायुती फिस्कटली, निवडणुकांसाठी नवी आघाडी

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

कोल्हापूर : राज्याच्या राजकारणात राजकीय समीकरणे बदलल्यानंतर शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने (NCP) भाजपसोबत जाण्यास नकार दिला. मात्र, अजित पवारांनी (Ajit pawar) काकांच्या विरोधात उभे राहून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपला स्वतंत्र गट निर्माण केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा आपल्याकडे घेत महायुतीत सहभागी होऊन सत्तेत जाणे पसंत केले. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी एकत्र येत आहे. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं वक्तव्य तेथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक नेत्याने केले होते. तर, आता कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये (Kolhapur) दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत.

भाजपला दूर ठेवत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचं निश्चित झालं असून मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. चंदगड नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोमिलन झालं आहे, मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंदगडमधील कुपेकर गट आणि राजेश पाटील यांना एकत्र आणल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट असून शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने भाजपसोबत कदापि युती शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. भाजप स्थानिक निवडणुकीत राष्ट्रवादीला विचारातच घेत नसेल तर जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा नेता म्हणून एकाकी पाडणे शक्य नाही, काही निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळेच, आघाडी स्थापन करुन निवडणुका लढविण्याचा निर्णय घेत असल्याचं हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना म्हटलं.

काँग्रेसलाही सोबत घेण्याची तयारी

दरम्यान, चंदगडमध्ये विधानसभा निवडणुकीत नंदाताई बाभुळकर आणि राजेश पाटील हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, नगरपालिका निवडणुकांसाठी राजर्षी शाहू विकास आघाडी स्थापन करुन दोन्ही राष्ट्रवादीचे हे नेते एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस देखील सोबत येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे, दोन राष्ट्रवादीसह काँग्रेसची स्वतंत्र आघाडी येथे पाहायला मिळेल.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon