भाजप महापौरपदाच्या शर्यतीतून बाहेर, राजकीय हालचाली वाढल्या; नेमकं काय घडतंय?

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

कल्याण-डोंबिवली महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर झाल्याने हर्षाली थविल यांचे नाव चर्चेत आले आहे. ३ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपचे ५० नगरसेवक कोकण भवनाकडे रवाना झाले आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्ताकारणात सध्या कमालीची चुरस निर्माण झाली आहे. केडीएमसीचे महापौरपद अनुसूचित जमाती (ST) महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत. या आरक्षणामुळे भाजप महापौरपदाच्या शर्यतीतून तांत्रिकदृष्ट्या बाहेर पडला आहे. सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल यांचे नाव सध्या सर्वात आघाडीवर आहे.

कल्याण डोंबिवलीत महापौरपदासाठीची सोडत जाहीर झाली आहे. हे पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले आहे. भाजपच्या ५० नगरसेवकांपैकी एकही या प्रवर्गातील नाही. त्यामुळे भाजपने आता गट स्थापनेवर लक्ष केंद्रित केले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे पारडे जड झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या शिवसेना शिंदे गटाकडे या प्रवर्गातील दोन सक्षम उमेदवार आहेत. हर्षाली थविल आणि किरण भांगले अशी या दोघांची नावे आहेत. यात हर्षाली थविल या अनुभवी असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांच्या मनसेने ५ नगरसेवकांसह शिवसेनेला पाठिंबा दिल्याने महायुतीचे संख्याबळ भक्कम झाले आहे. भाजपचे ५० नगरसेवक आज सकाळीच डोंबिवलीतून कोकण भवनाकडे रवाना झाले आहेत. सध्या भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अधिकृत गट नोंदणी आणि निवडणुकीच्या रणनीतीसाठी ही हालचाल सुरू आहे.

आघाडीवर कोणाचे नाव?

केडीएमसीच्या महापौरपदासाठी नगरसेविका हर्षाली थविल यांची चर्चा केवळ राजकीय समीकरणामुळे नाही, तर त्यांच्या साध्या राहणीमानामुळे होत आहे. अटाळी परिसरातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या हर्षाली आजही आपल्या पतीसोबत भाड्याच्या घरात राहतात. जेव्हा हर्षाली थविल यांचे नाव महापौर पदाच्या शर्यतीसाठी चर्चेत आले, तेव्हा त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. आमच्या लेकीचे नाव महापौरपदासाठी चर्चेत येताच तिच्या आई-वडिलांना भावना अनावर झाल्या. “तिने फक्त लोकांची कामे करावीत, आम्हाला काही नको,” अशी प्रतिक्रिया त्यांच्या आईने दिली. एका सामान्य घरातील मुलगी शहराचे प्रथम नागरिक पद भूषवणार या कल्पनेनेच संपूर्ण अटाळी परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान महापालिका प्रशासनाने महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार महापौर पदासाठी २९ आणि ३० जानेवारी सकाळी ११ ते ५.३० या वेळेत दोन दिवस अर्ज दाखल करावे लागणार आहे. येत्या ३ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. तसेच ३ फेब्रुवारी रोजी सकाळी महापालिकेत विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले असून, तिथेच नव्या महापौरांची घोषणा होईल.

पुढील अडीच वर्षांचा फॉर्म्युला?

मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीत अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. भाजप सध्या महापौरपदाच्या शर्यतीत नसली तरी उपमहापौरपद किंवा स्थायी समिती सभापती पदावर आपली पकड मजबूत ठेवण्याच्या प्रयत्नात आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon