Sharad Pawar NCP and Ajit Pawar NCP : दोन्ही राष्ट्रवादीच्या येण्याबाबत खासदार शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Sharad Pawar NCP and Ajit Pawar NCP : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जुलै 2023 मध्ये खासदार शरद पवारांच्या (Sharad Pawar) भूमिकेशी फारकत घेऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) कोणाचा यावरुन दोन्ही नेते न्यायालयातही गेले आहेत. लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक देखील दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढली होती. मात्र, आता शरद पवारांच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या आहेत. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, संसदेत विरोधी बाकांवर बसावं की नाही? हा निर्णय सुप्रियानं घ्यावा. सुप्रिया सुळेंचं काय? या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. पक्षात दोन प्रवाह आहेत, एकाला वाटते अजितसोबत जावे. दुसरा प्रवाह भाजपपासून दूर राहावे या मताचा आहे, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
शरद पवार म्हणाले, भविष्यात एकत्र यायचं की नाही? हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालोय…आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकत्र आहेत. आमचे दिल्लीतील खासदारही एकाच विचाराने बांघले गेलेले आहेत. होय, राज्यातील आमच्या काही आमदारांना असं वाटतं मतदारसंघातली विकासकामं करून घेण्यासाठी अजित पवारांसोबत गेलं पाहिजे, पण याबाबतचा निर्णय हा मी देणार नाही, त्यांनी तो निर्णय एकत्र बसून घ्यावा.
एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजितने बसून ठरवावं. पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेलं सगळे एकत्र होते त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकचं आहे. त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. माझे सगळे खासदार एक मताचे आहेत, आमदारामध्ये अस्वस्थता असू शकते. मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे. पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.
छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया
शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आशेचा किरण दाखवलाय. त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल. हे मनोमिलन लवकरात लवकर व्हावं अशीच इच्छा मी व्यक्त करतो. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर मी मध्यस्थीसाठी तयार आहे, पण अजित पवार हे पवारसाहेबांच्या घरातच वाढलेत, त्यामुळे त्यांच्या मनोमिलनासाठी मध्यस्थाची गरज आहे, असं वाटत नाही.