राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या कारमधील स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटलेल्या आहेत.

दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनजवळ आज मोठा स्फोट झाला आहे, या स्फोटामुळे परिसरात एकाच गोंधळ उडाला, नागरिकांची धावपळ उडाली, स्फोटामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की स्फोटानंतर या पार्किंगमध्ये असलेल्या सात ते आठ गाड्यांनी पेट घेतला, कार जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून, 24 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
लोकांची मोठी गर्दी, परिस्थितीत घबराटीचे वातावरण
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एक कार उभी होती. याच कारमध्ये हा स्फोट झालेला आहे. स्फोट झाल्यानंतर लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. लोकांनी घटनास्थळी जात गर्दी केली. ही गाडी लाल किल्ला परिसरातील मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर उभी होती. स्फोट झाल्यानंतर काही काळासाठी येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हल्ला घडवून आण्यात आला का?
दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर लगेचच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. कारमधील स्फोटानंतर आग लागली. हीच आग विझविण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून केला जात आहे. दुसरीकडे बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. कारमध्ये स्फोट नेमका का झाला? यामागे काही घातपाताचा उद्देश तर नव्हता ना? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता शोधली जाणार आहेत.
दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी
या स्फोटानंतर लाल किल्ला परिसर तातडीने रिकामा करण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचले आहेत. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ पार्किंमध्ये असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला आहे. या घटनेनंतर दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
दहशतवादी स्फोटाची शक्यता
गेल्या चार दिवसात, 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान दिल्ली पोलिसांनी कारवाई करत काही संशयितांना पकडले आहे. त्यामध्ये आयसिसच्या चार दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकंही जप्त करण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटामुळे संशय अधिक बळावला आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला.



