Rohit Sharma IND vs AUS 3rd Odi : रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार खेळी करत चाहत्यांची मनं जिंकली. आता रोहितकडे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
हिटमॅन रोहित शर्मा याला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. रोहित 8 धावांवर बाद झाल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. मात्र रोहितने एडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात कमाल केली. रोहितने एडलेडमध्ये 73 धावांची खेळी केली. रोहितने या खेळीसह अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आता रोहितकडे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा सामना हा सिडनीत होणार आहे. रोहित या सामन्यात 1 मोठा फटका मारताच आशियाचा सिक्सर किंग ठरेल.
रोहितकडे सनथ जयसूर्याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी
रोहितला सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा पहिला आशियाई फलंदाज होण्याची संधी आहे. सध्या हा विक्रम संयुक्तरित्या रोहित आणि श्रीलंकेचा दिग्गज माजी फलंदाज सनथ जयसूर्या यांच्या नावावर आहे. या दोन्ही फलंदाजांनी प्रत्येकी 9 षटकार लगावले आहेत. त्यामुळे आता हिटमॅनला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी अवघ्या 1 सिक्सची गरज आहे.
रोहितची सिडनीतील आकडेवारी
रोहितने आतापर्यंत वनडेत सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये बॅटिंगने चमकदार कामगिरी केली आहे. रोहितने या मैदानात एकूण 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 333 धावा केल्या आहेत. रोहितने 66.60 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. हिटमॅनने या दरम्यान 1 शतक आणि 2 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच रोहित सिडनीत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
रोहित शर्मा याच्यानंतर या मैदानात भारतासाठी सचिन तेंडुलकर याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. सचिनने या मैदानात 315 धावा केल्या होत्या. सचिनने 52 च्या सरासरीने या धावा केल्या होत्या.
संबंधित बातम्या
टीम इंडियाची सिडनीतील कामगिरी
दरम्यान टीम इंडियासाठी तिसरा आणि अंतिम सामना हा प्रतिष्ठेचा आहे. भारताने सलग 2 सामन्यांसह मालिका गमावली. टीम इंडिया या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. आता टीम इंडियासमोर क्लिन स्वीप टाळण्याचं आव्हान आहे.
भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्लिन स्वीपने वनडे सीरिज गमावलेली नाही. त्यामुळे भारतासमोर तिसरा आणि अंतिम सामना जिंकून लाज राखण्याचं आव्हान आहे. टीम इंडियाची सिडनीतील आकडेवारी चिंताजनक अशी आहे. भारताने या मैदानात एकूण 19 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त 2 सामन्यांमध्येच भारताला विजयी होता आलं आहे. त्यामुळे आता टीम इंडिया तिसऱ्या सामन्यात कशी कामगिरी करते? याकडे लक्ष असणार आहे.



