रांची, 02 ऑगस्ट (हिं.स.) : काँग्रेस नेते राहुल गांधी जातनिहाय जनगणनेची मागणी करीत आहेत. परंतु, जेव्हा लोक त्यांची जात विचारतात तेव्हा त्यांना त्रास होतो. मी जातनिहाय जनगणना करेन मात्र, स्वतःची जात सांगणार नाही असे कसे होईल.. ? असा सवाल आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी उपस्थित केलाय. ते आज, शुक्रवारी झारखंडमध्ये बोलत होते.
याविषयावर बोलताना सरमा म्हणाले की, पूर्वी राहुल गांधी पत्रकारांना त्यांची जात विचारत होते. आता जेव्हा लोक त्यांना त्यांच्या जातीबद्दल विचारत आहेत, तेव्हा त्यांना त्रास होत आहे. राहुल गांधी म्हणतात, मी जातनिहाय जनगणना करेन, मात्र स्वतःची जात सांगणार नाही. असे कसे चालेल ? जर जातनिहाय जनगणना झाली तर राहुल गांधींनाही स्वतःची जात सांगावी लागेल असे सरमा म्हणाले. राहुल गांधी यांच्या जातीची चर्चा गेल्या तीन दिवसांपूर्वी लोकसभेत सुरू झाली. भाजपा खासदार अनुराग ठाकूर म्हणाले होते की, “ज्यांना आपली जात माहीत नाही, ते जातनिहाय जनगणनेच्या गप्पा मारत आहेत.” त्यांच्या या विदानावरून सभागृहात बराच गदारोळ झाला होता.
यावर सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही आक्षेप घेत आपण जात कशी विचारू शखता..? असा सवाल केला होता. याशिवाय, विरोधकांनीही आक्रमक होत, अनुराग ठाकूर यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. यानंतर, अनुराग ठाकूर यांनी अखिलेश यादव यांना एक व्हिडिओच्या माध्यमाने प्रत्युत्तर दिले होते. अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दिखावूपणा आणि सत्य असा उल्लेख करत अखिलेश यादव यांचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमधील एका बाजूला अखिलेश यादव यांनी नुकतेच केलेले विधान दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला ते काही पत्रकारांशी साधलेल्या संवादात जात विचारताना दिसत आहेत. अखिलेश यांच्या विरोधात ठाकूर यांचे ट्विट आल्यानंतर शुक्रवारी हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर टिप्पणी केलीय.