Sarangkheda Horse Market: जगप्रसिद्ध सारंगखेडा अश्व यात्रेत यंदा विशेष आकर्षण ठरलेली ‘रुद्राणी’ ही घोडी पाहण्यासाठी अश्वप्रेमींची तुफान गर्दी होत आहे
Sarangkheda Horse Market: जगप्रसिद्ध सारंगखेडा अश्व यात्रेत (Sarangkheda Horse Market) यंदा विशेष आकर्षण ठरलेली ‘रुद्राणी’ ही घोडी पाहण्यासाठी अश्वप्रेमींची तुफान गर्दी होत आहे. पुष्कर बाजारात तब्बल 1 कोटी 17 लाख रुपये इतकी किंमत लागलेल्या या घोडीचे आगमन होताच अश्वप्रेमी आणि नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. देशभरातील घोडे विक्रीसाठी येणारा हा अश्व बाजार विविधतेसाठी ओळखला जातो आणि यंदा ‘रुद्राणी’ने त्या आकर्षणात आणखी भर घातली आहे.
Sarangkheda Horse Market: रुद्राणीची वैशिष्ट्ये सर्वांना आकर्षित करणारी
वयाने केवळ 22 महिन्यांची असलेल्या या घोडीची 65 इंच उंची, संतुलित अंगकाठी आणि प्रभावी चाल पाहून अश्व जाणकारही थक्क झाले आहेत. एवढ्या लहान वयात तिची उंची, स्नायूंची मजबुती आणि आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व यात्रेत चर्चेचा विषय ठरला आहे.
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आलेली खास पाहुणी
रुद्राणीला विशेष काळजी आणि प्रशिक्षण दिले जाते. तिच्या आहारात दररोज 8 लिटर गाईचे दूध असते. यामुळे तिची तंदुरुस्ती, चमकदार अंगकाठी आणि उठावदार व्यक्तिमत्त्व कायम राहते. तिच्या या देखण्या रूपामुळे यात्रेत तिच्या आसपास नेहमीच गर्दी उसळते. रुद्राणीला यंदा सारंगखेडा यात्रेत प्रदर्शित करण्यासाठी मध्य प्रदेशातील महेश्वर परिसरातील यादव इस्टेट फार्मचे राजेंद्र यादव यांनी आणले आहे. घोडीचे आगमन होताच यात्रेत तिच्या छायाचित्रांसाठी मोबाईल कॅमेऱ्यांची झळाळी थांबेना. कोट्यवधींच्या मुल्याची ही ‘रुद्राणी’ घोडी यात्रेतील प्रमुख आकर्षण ठरत असून, तिच्या सौंदर्याने आणि वैशिष्ट्यांनी ती उपस्थितांच्या मनावर राज करत आहे.
संबंधित बातम्या
Sarangkheda Horse Market: सारंगखेडा अश्व बाजारात 67 लाखांची उलाढाल
दरम्यान, सारंगखेडा अश्व बाजारा अवघ्या तीन दिवसांत 145 घोड्यांची विक्री होऊन तब्बल 67 लाखांची उलाढाल झाल्याची माहिती चेतक फेस्टिव्हलचे आयोजक जयपालसिंग रावल यांनी दिली आहे. या वर्षी आतापर्यंत 3 हजाराहून अधिक घोड्यांचे आगमन झाले असून, पुढील काही दिवसांत हा आकडा साडेतीन हजारांवर जाण्याची शक्यता आहे. पंजाब, काठेवाडी, मारवाडी आदी जातींचे घोडे मोठ्या प्रमाणावर दाखल होत असून, देशभरातील व्यापारी, खरेदीदार आणि घोड्यांचे पालन करणारे या यात्रेला हजेरी लावत आहेत. अश्व बाजारातील उत्साह आणि खरेदीची वाढती मागणी लक्षात घेता यंदाची उलाढाल तब्बल साडेपाच कोटी रुपयांहून अधिक होईल, असा अंदाज आयोजक जयपालसिंग रावल यांनी व्यक्त केलाय. यात्रेत दररोज मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असून, अनेक वर्षांतील हा सर्वाधिक विक्रीचा हंगाम ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.




