सत्तासंघर्षाचा निकाल; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
सांगोला -सांगोला नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, निकालाकडे सर्वच राजकीय पक्ष, उमेदवार आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नगरपालिकेच्या सत्तेची चावी कोणाच्या हाती जाणार, कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार, तसेच नगराध्यक्षपदावर कोण विराजमान होणार, याबाबत शहरात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीसाठी आवश्यक तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली असून, कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
या निवडणुकीत विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या संख्येने निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. त्यामुळे निकालात चुरशीचे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निकालानंतर सांगोला शहराच्या राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम होणार आहे.

सांगोला नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक ही यावेळी अत्यंत चुरशीची ठरली आहे. या निवडणुकीत एका बाजूला आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील आणि भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांची आघाडी होती, तर दुसर्या बाजूला माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचे नेतृत्व असलेली आघाडी निवडणूक रिंगणात होती. माजी नगराध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी आपल्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भूमिका घेत आपली राजकीय ताकद आजमावली.
सांगोला नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी यावेळी अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी अशी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सांगोला शहर विकास आघाडी तर्फे मारुतीआबा बनकर, शिवसेना तर्फे आनंदा माने तसेच अपक्ष उमेदवार विश्वेष झपके यांनी आपले नशीब आजमावले.सांगोला शहर विकास आघाडीचे उमेदवार मारुतीआबा बनकर यांनी अनुभवी नेतृत्व व विकासाभिमुख भूमिका मांडली, तर शिवसेनेचे उमेदवार आनंदा माने यांनी पक्षाची ताकद आणि संघटन यंत्रणा प्रभावीपणे वापरली. अपक्ष उमेदवार विश्वेष झपके यांनी नव्या विचारांची मांडणी करत थेट जनतेशी संवाद साधण्यावर भर दिला.
सांगोला नगरपालिका निवडणुकीत यावेळी चिन्हांचा मुद्दा चर्चेचा ठरला. शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना एकच अधिकृत पक्षचिन्ह मिळाल्याने प्रचारात एकसंधपणा आणि ओळख निर्माण झाली होती. त्यामुळे मतदारांना शिवसेनेचे उमेदवार ओळखणे सोपे झाले होते.
संबंधित बातम्या
https://www.instagram.com/reel/DSbngdoiCGs/?igsh=MXU2ejdnaG9tdnR3cg==
याउलट सांगोला शहर विकास आघाडी ही आघाडी स्वरूपात निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे तिच्या उमेदवारांना वेगवेगळी चिन्हे मिळाली होती. त्यामुळे मतदारांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा शहरात होती. तरीही आघाडीतील नेत्यांनी प्रचारादरम्यान प्रत्येक उमेदवाराचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर दिला.चिन्हांच्या या वेगळ्या रचनेमुळे निवडणूक अधिकच रंजक बनली होती. एकीकडे एकसंध चिन्हावर लढणारी शिवसेना, तर दुसरीकडे वेगवेगळ्या चिन्हांसह विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेली सांगोला शहर विकास आघाडी-या पार्श्वभूमीवर मतदारांनी कोणाला पसंती दिली, हे निकालातून स्पष्ट होणार आहे.
-
सांगोला नगरपालिकेच्या सत्तेवर कोणाची पकड बसणार, शहराच्या राजकारणात कोणाची सरशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता रविवारी जाहीर होणार्या निकालातून मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला, हे स्पष्ट होणार आहे. निकालामुळे सांगोला नगरपालिकेच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाची दिशा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.




