राजीनामा प्रज्ञा सातव यांचा, पण कोंडी सतेज पाटलांची? नंबरमुळे ‘गेम’, ठाकरेंचा फायदा होण्याची चर्चा

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Vidhan Parishad : विधान परिषदेत काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र, आता प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे हे नाव मागे जाऊ शकते.

मुंबई : गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय राहिलेले दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या विधान परिषदेतील आमदार प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे परिषदेतील संख्याबळ आठवरून सातवर आले असल्याने विरोधी पक्षनेतेपदाच्या काँग्रेसच्या स्वप्नाला धक्का लागण्याची चिन्हे आहेत.

प्रज्ञा सातव यांचा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता, मात्र त्यांचे दिवंगत पती राजीव सातव हे खासदार होते व राहुल गांधी यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जात. राजीव यांचा करोनाच्या साथीत अकाली मृत्यू झाल्यानंतर गांधी कुटुंबाने स्वतःहून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर पाठवले. वास्तविक पाहता, काँग्रेसमधील अनेक होतकरूंनी तेव्हा या जागेसाठी आग्रह धरला होता, मात्र सातव यांचे नाव येताच गांधी कुटुंबाच्या निकटवर्तीय म्हणून काँग्रेसच्या सगळ्याच गटातटांमध्ये शांतता पसरली होती.

आता गांधी कुटुंबाच्या निकटवर्तीयानेच राजीनामा देत भाजपची वाट धरल्याने काँग्रेस पक्षातले नक्की कोण आणि किती जण गांधी कुटुंबाशी किंवा काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे उद्विग्न उद्गार काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याने ‘मटा’शी बोलताना काढले.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे द्यावे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद आपले संख्याबळ शिवसेनेपेक्षा एकाने अधिक असल्याने आपल्याला मिळावे, असा काँग्रेस पक्षाचा दावा होता. महायुतीचे सरकार आल्यापासूनच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीचे नेते विरोधी पक्षनेतेपदासाठी आग्रही आहेत. सातव यांच्या राजीनाम्यापूर्वी विधान परिषदेत काँग्रेसचे एकूण आठ आमदार कार्यरत होते. तर, अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर शिवसेना-उबाठाचे सहा आमदार आहेत.

सातव, माने भाजपमध्ये

हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव आणि सोलापूर दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी समर्थकांसह गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात हे पक्षप्रवेश पार पडले. या वेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह, भाजप माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.

प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा कार्यकाळ २७ जुलै २०३० रोजी संपणार होता; पण तत्पूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या विधान परिषदेत काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र, आता सातव यांच्या राजीनाम्यामुळे हे नाव मागे जाऊ शकते. पाटील यांच्यासह काँग्रेसच्या इतर आमदारांमध्ये भाई जगताप, जयंत आसगावकर, राजेश राठोड, धीरज लिंगाडे आणि अभिजित वंजारी; तसेच सहयोगी सदस्य म्हणून सुधाकर अडबाले असे सात आमदार कार्यरत आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षात उद्धव ठाकरे, अनिल परब, सुनील शिंदे, मिलिंद नार्वेकर, जगन्नाथ अभ्यंकर आणि सचिन अहिर हे विधान परिषदेत आमदार आहेत. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon