Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मुंबईत सुरु आहे. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत भाजपसोबत युती नको, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. शरद पवार यांनी बैठकीत पक्षानं भाजप सोबत युती करु नये अशा सूचना दिल्याची माहिती एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. याशिवाय स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत मूळ ओबीसींना उमेदवारी द्यावी, जर मूळ ओबीसी प्रमाणपत्रधारक उमेदवार मिळाला नाही तर कुणबी प्रमाणपत्र धारक उमेदवाराचा विचार करावा अशा सूचना दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
कोणत्याही परिस्थितीत भाजपसोब युती नको : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे खासदार, आमदार उपस्थित होते. शरद पवारांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचं नाही अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करण्याचा मार्ग या निमित्तानं मोकळा झाला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी उमेदवार असतील त्यांना प्राधान्य द्यावं. मूळ ओबीसी प्रमाणपत्र धारक उमेदवार मिळत नसेल तर त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना उमेदवारी द्यावी,अशा प्रकारच्या सूचना शरद पवार यांनी दिली आहे. ज्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण पडलं आहे, तिथं मूळ ओबीसींना उमेदवारी द्यावी. मूळ ओबीसींना कुठेही दुखवू नका अशा सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं होतं. राष्ट्रवादीनं लोकसभेच्या 10 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 8 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळवला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला 10 जागांवर विजय मिळाला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. आज मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे पक्षाचे खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर आली असून शरद पवारांचा पक्ष केवळ भाजपसोबत कुठेही युती करणार नाही.
दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं देखील फक्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत कुठेही युती होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.



