मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC प्रक्रियेची गती निराशाजनक आहे. अद्याप १.६० कोटी महिलांची e-KYC अपूर्ण असून, १८ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत जवळ येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र या अनिवार्य करण्यात आलेल्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेची गती अत्यंत निराशाजनक आहे. अनेक महिलांना ई-केवायसी करताना तांत्रिक अडचणींचा सामना करवा लागत आहे. या योजनेच्या एकूण २.४० कोटी लाभार्थी महिलांपैकी अद्यापही दोन-तृतीयांश महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे. त्यामुळे अनेक महिलांचा लाडकी बहीण योजनेचा हफ्ता बंद होण्याची शक्यता आहे.
ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने १८ नोव्हेंबर २०२५ ची अंतिम मुदत निश्चित केली आहे. यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. सध्या केवळ ८० लाख महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित सुमारे १ कोटी ६० लाख महिलांना वेळेत ई केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. अन्यथा, हप्ता बंद होण्याची शक्यता आहे. ई-केवायसीच्या या गतीमागे अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी आहेत. यामध्ये सर्वात मोठी समस्या विधवा आणि घटस्फोटीत स्त्रियांच्या केवायसीमध्ये येत आहे.
ई-केवायसी करताना लाभार्थी महिलेला स्वतःच्या आधार कार्डासोबतच, कुटुंबातील सदस्याचा (पती किंवा वडिलांचा) आधार क्रमांक आणि ओटीपी (OTP) प्रक्रियेतून पडताळणी करावी लागते. ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, त्यांना आधार क्रमांकाची माहिती देणे किंवा त्यासंबंधीचा ओटीपी मिळवणे शक्य होत नाही. यामुळे या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही.
संबंधित बातम्या
अदिती तटकरे काय म्हणाल्या?
लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी गरजेची आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे अनेक गरजू महिलांना लाभ मिळण्यापासून वंचित राहू शकतात, असे बोललं जात आहे. आता महिला व बालविकास विभागाने याची दखल घेतली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या समस्येची कबुली दिली आहे. विधवा आणि घटस्फोटीत स्त्रियांच्या ई केवायसी करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी काम सुरू आहे. त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तांत्रिक प्रणालीत सुधारणा करण्याचे आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.
दरम्यान पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ई-केवायसीची मुदत १५ दिवसांनी वाढवली असली तरी, उर्वरित सर्व महिलांसाठी १८ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत कायम आहे. त्यांनी सर्व पात्र महिलांना आवाहन केले आहे की, या मुदतीपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्त्यांसाठी त्यांना अडचण येऊ शकते.




