Ravindra Dhangekar On Murlidhar Mohol: पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा अन्…रविंद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर नवा बॉम्ब,

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Ravindra Dhangekar On Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ महापौर असताना बढेकर बिल्डरची गाडी वापरत होते, असा आरोप रविंद्र धंगेकरांनी केला आहे. तसेच पुरावा म्हणून पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीचा नंबरही रविंद्र धंगेकर यांनी दिला आहे.

Ravindra Dhangekar On Murlidhar Mohol: शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावर आरोपांचा एक नवा बॉम्ब टाकला आहे. मुरलीधर मोहोळ महापौर असताना बढेकर बिल्डरची गाडी वापरत होते, असा आरोप रविंद्र धंगेकरांनी केला आहे. तसेच पुरावा म्हणून पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीचा नंबरही रविंद्र धंगेकर यांनी दिला आहे. बढेकर बिल्डर मुरलीधर मोहोळांचे पार्टनर असून जैन होस्टेलच्या लिलावात सहभागी असल्याचा दावाही रविंद्र धंगेकरांनी केला आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या काळातच कामांचे टेंडर एक ऐवजी 5 ते 20 वर्षांसाठी दिले, असंही रविंद्र धंगेकरांनी सांगितले.

रविंद्र धंगेकर फेसबुक पोस्ट करत काय काय म्हणाले? (Ravindra Dhangekar On Murlidhar Mohol)

पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन होस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसात पाहिले आहेत. परंतु तरी देखील ते या सर्व गोष्टी योगायोग असल्याचं सांगतात. मी आपणास काही माहिती देऊ इच्छितो, मोहोळ हे खासदार होण्याच्या अगोदर पुण्यनगरीचे महापौर होते.हे महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी लावून महापौर पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरायचे. त्या गाडीचा नंबर होता MH12 SW 0909…ही गाडी ना मोहोळ यांची होती ना पुणे महानगरपालिकेचे शासकीय वाहन…तर ही गाडी होती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची…हे तेच बिल्डर आहे ज्यांनी जैन होस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर…, असं रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. पुणे महानगरपालिकेत महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खाजगी व्यावसायिकाचे वाहन वापरणे हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का..? साडेनऊ हजार कोटींचे बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी घेता नाही आली का..? या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले..? विशेषतः कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात   सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला देण्यात आलेले आहेत,  असं धंगेकरांनी सांगितले.

माननीयांची संपत्ती तब्बल चारशे पटीने वाढली- धंगेकरांचा दावा (Ravindra Dhangekar)

वेताळ टेकडी येथे टनेल, HCMTR रस्ता आणि बालभारती ते पौड फाटा लिंक रोड हा प्रोजेक्ट आणण्यासाठी माननीय इतके अतिउत्साही आहेत की, त्यांनी हजारो पर्यावरणवाद्यांचा विरोध पत्करला. तुम्हाला वाटेल की हे सर्व ते ट्राफिक कोंडीतून मुक्तता व्हावी यासाठी करत आहेत. परंतु नाही गोखले, बढेकर आणि आणखी तीन बिल्डर यांच्या जमिनी या भागात आहेत.  वेताळ टेकडी परिसरात या बिल्डरांना प्रोजेक्ट करता यावेत ,यासाठी त्यांनी हा घाट घातला आहे. अर्थात बिल्डर नावाला असतात हेच मालक असतात. आता हे शपथ पत्रात लीगल बिल्डर पार्टनरशिप दाखवतात तर अनधिकृत किती पार्टनरशिप असतील..? याचा विचार न केलेला बरा…या बढेकर बिल्डरचे मागच्या 5 वर्षातले बॅलन्सशीट काढले तर लक्षात येईल की यांनी किती कोटीच्या कोटी उड्डाणे सहज गाठली आहेत. अर्थात महापौरपद व केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत मनी लॉन्ड्रींगचा प्रकार या कंपनीतद्वारे केल्याचे लक्षात येईल. त्यामुळेच माननीयांची संपत्ती तब्बल चारशे पटीने वाढली आहे, असा दावा धंगेकरांनी केला.

जमीन लुटणाऱ्या प्रत्येकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे- रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)

खरंतर या बढेकर बिल्डर सोबत पार्टनरशिप ही दमदाट्या करूनच करण्यात आली होती. अगोदर दमदाट्या केल्या. त्या बिल्डरने वैतागून गुन्हा दाखल केला आणि मग महापौरांचा मोबाईल हॅक झाल्याचा कांगावा केला. आता बढेकर कंपनीत केवळ नावाला उरले आहेत. परंतु माननीय म्हणतील की,आता मी राजीनामा दिला आहे आणि बढेकर बिल्डरचे नाव जैन बोर्डिंग प्रकरणात येणं हा निव्वळ योगायोग आहे. यांच्या अनेक प्रतापाकडे मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं परंतु ज्या दिवशी यांनी जैन मंदिराच्या विषयात अतिशय चुकीच्या पद्धतीने जागा लुटली तेव्हा मला हे प्रकरण लावून धरावं असं वाटले. या प्रकरणात वेगवेगळे खुलासे आणि पुरावे देत असताना त्याची निपक्ष:पातीपणे चौकशी झाली पाहिजे. आपल्या देशात अनेक तपास यंत्रणा आहे त्यांनी या सगळ्या गोष्टींचा तपास केला पाहिजे तर पुणेकरांची झालेली फसवणूक लुटमार लोकांच्या समोर येईल. एक गोष्ट मी निश्चितपणाने सांगू इच्छितो, या पुण्यनगरीच्या विकासात आजवर अनेक महापौरांनी योगदान दिले परंतु यात अतिशय विक्रमी भ्रष्ट कारकीर्द राहिली ती विद्यमान खासदारांची. कुठल्याही कामाचे एक वर्षाचे टेंडर देण्याची पूर्वापार पद्धत बदलत 5/10/15/20 वर्षांचे टेंडर देण्यात आले. यामुळे महापालिकेची अतिशय दुरावस्था झाली ती यांच्या काळातच. असो…जैन बोर्डींग प्रकरणी व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि ही जमीन लुटणाऱ्या प्रत्येकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी धंगेकरांनी केली आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon