सांगोला : शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी सांगोला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उदघाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे उदघाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, पंढरपूर विभागाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ.संजय मुजमुले यांच्याहस्ते स्वच्छतादूत संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.सुरेश भोसले होते. याप्रसंगी डॉ. मुजमुले सर म्हणाले की, माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हे राष्ट्रीय सेवा योजनेचे बोधवाक्य आहे. ते आपणाला लोकशाही,सामाजिक बांधिलकीची जाणीव करुन देते. तसेच निस्वार्थ सेवेची गरज दाखवुन देते. या बोधवाक्यात दुसर्या व्यक्तिचा दृष्टीकोन विचारात घेतला पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेतील चिन्ह हे ओरिसा राज्यातील कोणार्क येथील सुर्य मंदिराच्या रथाच्या चाकावर आधारित आहे. चक्र हे गतीचे प्रतिक आहे. गतिमुळे सामजिक परिवर्तन होऊ शकते व त्यासाठी आजच्या महाविद्यालयीन युवक-युवतींना राष्ट्रीय सेवा योजना हे सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे. त्या माध्यमातून परिवर्तन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभाग नोंदवावा.
याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी मत व्यक्त केले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करणे व त्यांचा सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली असून या कामात साक्षरता कार्य, पर्यावरण संरक्षण, आरोग्य आणि स्वच्छता आणि आपत्कालीन किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पीडित लोकांना मदत करणे हे स्वयंसेवकाचे काम आहे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सदाशिव देवकर यांनी केले तर आभार डॉ. रेणुकाचार्य खानापुरे यांनी मांडले सूत्रसंचालन प्रा.समाधान माने यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.राम पवार यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच डॉ. बबन गायकवाड, डॉ.अमोल पवार, प्रा.नितीन सुरवसे, श्री महादेव काशीद आणि विद्यार्थी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
सम्बंधित ख़बरें




