सांगोल्यात मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा वाढला धोका !

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला (प्रतिनिधी):- गेल्या दहा वर्षांपासून राज्यात लागू झालेल्या गोहत्या बंदी कायद्यामुळे मोकाट जनावरे, विशेषतः गाय, बैल आणि कुत्र्यांची संख्या सांगोला शहरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे नागरिक हैराण झाले असून, वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. पहाटेपासून रात्रीपर्यंत ही जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसतात, ज्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. कितीही हॉर्न वाजवला किंवा गर्दी झाली तरी ही जनावरे सहजासहजी बाजूला होत नाहीत. अनेकदा अचानक उठून उभी राहिल्याने लहान-मोठे अपघात घडले आहेत.

याशिवाय, मोकाट कुत्र्यांची वाढलेली संख्याही चिंतेचा विषय बनली आहे. कुत्री एकमेकांचा पाठलाग करतात, रात्रंदिवस मोठ्याने भुंकतात किंवा विव्हळतात. शाळकरी विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकारही घडत आहेत.

मोकाट देशी गायी आणि इतर जनावरे रस्त्यातच प्रातविधी उरकतात, त्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात दुर्गंधी पसरत असून, आरोग्याच्या समस्याही वाढण्याची भीती आहे.

नागरिक या समस्येने त्रस्त असतानाही, नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले दिसत नाही. मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात, वाहतूक कोंडी आणि स्वच्छतेच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

नागरिकांची मागणी

सांगोला नगरपालिका प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करत आहेत. प्रशासनाने यावर वेळीच कठोर पाऊले उचलली नाहीत, तर ही समस्या आणखी गंभीर रूप धारण करेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon