प्रत्येक महिलेला महिन्याला 2500, गॅस सिलेंडरवर 500 ची सबसिडी
निवडणुकीत भाजपकडून आश्वासनांचा पाऊस
दिल्लीची विधानसभा निवडणूक महिन्यावर येऊन ठेपलीये. भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काऊंटर करण्यासाठी भाजपने नव्या घोषणा केल्या आहेत. दिल्लीत झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे केजरीवाल यांच्यासमोर आव्हान उभं करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. दुसरीकडे काँग्रेसने देखील अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करत घेरण्याचा प्रयत्न केलाय.
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या महत्त्वाच्या घोषणा
महिला समृद्धी योजनेअंतर्गत दिल्लीतील प्रत्येक महिलेला दरमहा रु.2,500 दिले जातील.
गरीब भगिनींना सिलिंडरवर रु.500 ची सबसिडी दिली जाईल आणि होळी आणि दिवाळीला प्रत्येकी एक सिलेंडर मोफत दिला जाईल.
मातृ सुरक्षा वंदना अधिक बळकट करण्यासाठी 6 पोषण किट दिले जातील आणि प्रत्येक गर्भवती महिलेला 21,000 रुपये दिले जातील.
भाजपच्या जाहिरनाम्याबद्दल जेपी नड्डा काय काय म्हणाले?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले, महिला समृद्धी योजनेअंतर्गत दिल्लीतील प्रत्येक महिलेला 2500 रुपये दिले जातील. पहिल्या कॅबिनेट बैठकीत समृद्धी योजनेचा निर्णय घेतला जाईल. दिल्लीतील महिलांना प्रत्येक महिन्याला 2500 देण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने केलाय. दिल्लीत ज्या गरिब महिला आहेत, त्यांना एलपीजी सिलेंडरमध्ये 500 रुपयांची सबसिडी दिली जाईल. रंगपंचमी आणि दिवळीला प्रत्येकी एक सिलेंडर मोफत दिला जाईल. त्याच प्रमाणे मातृ सुरक्षा वंदना योजनेला आणखी ताकद दिली जाईल. यासाठी 6 कीट दिले जातील. प्रत्येक गर्भवती महिलेला 21,000 रुपये देखील दिले जातील.