AUS vs IND : टीम इंडियाने 10 वर्षांनंतर BGT मालिका गमावली, ऑस्ट्रेलियाचा 3-1 ने विजय

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील तिसर्याच दिवशी धुव्वा उडवला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतावर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 4 विकेट्स गमावून 27 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने या विजयासह ही मालिका 3-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाने यासह एका दशकाची प्रतिक्षा संपवली. ऑस्ट्रेलियाने 2014-2015 नंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाचा या पराभवासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या शर्यतीतूनही पत्ता कट झाला आहे.
10 वर्षांची प्रतिक्षा संपली
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात याआधी 4 सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळवण्यात यायची. ऑस्ट्रेलियाने अखेरीस 2014-15 साली मायदेशात टीम इंडियावर 2-1 अशा फरकाने मात करत मालिका जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियाने सलग 3 वेळा या 2-1 अशा फरकाने ही मालिका जिंकली. मात्र यंदापासून या मालिकेत 4 ऐवजी 5 सामने खेळवण्याची पहिलीच वेळ ठरली. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडियाने विजयी सलामी देत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर कौटुंबिक कारणामुळे पहिल्या सामन्यात अनुपस्थितीत असलेला नियमित कर्णधार रोहित शर्मा परतला. रोहितच्या नेतृत्वात भारताला 2 सामने गमवावे लागले तर 1 सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे चौथ्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली.