crimemaharashtratop news

मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक

पुण्यातील अपघाताचं सत्र सुरुच असून वाघोली झालेल्या भीषण अपघातानंतर आता पुण्यात पुन्हा एक विचित्र अपघात झाला आहे.पुण्यातील चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका मद्यधुंद कार चालकाने 9 वाहनांना धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या विचित्र अपघातात एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून, इतर वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत जीवित हानी झालेली नाही. हा अपघात शहराच्या मध्यवर्ती भागातून जाताना घडला. दयानंद केदारी असे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या कारचालकाचे नाव आहे. पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर संबंधित कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

घटनेनुसार, कारचालकाने मद्यप्राशन केल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याने अनेक वाहनांना धडक दिली. अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, घटनास्थळावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.या अपघातामुळे वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. पुणे पोलिसांनी अपघातग्रस्त भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

 

Related Articles

Back to top button