तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
रायगड : विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वीपासूनच सुरू असलेल्या कर्जत-खालापूर मतदारसंघातील वाद आता निकालानंतरही कायम दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांचा आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता. कारण, महेंद्र थोरवे यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्याकडून प्रयत्न झाल्याचा आरोप स्वत: थोरवे यांनी केला होता. त्यानंतर, सुनिल तटकरेंच्य कन्या आणि आमदार आदिती तटकरे यांनी महेंद्र थोरवेवर पलटवार करताना, ते काठावर वाचले आहेत, त्यांनी विजयाची हवा डोक्यात जाऊ देऊ नये, असा टोला लगावला होता. त्यामुळे, थोरवे अन् तटकरे यांच्यातील वाद आता अधिकच चिघळत चालल्याचे दिसून येत आहे. कारण, आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorave) यांनी अदिती तटकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना तुमच्या बापाच्या पापा मुळेच माझं मताधिक्य घटल्याच आरोप केला आहे.
मी जे काही निवडून आलेलो आहे ते काही काठावर निवडून आलेलो नाही. याउलट तुमचेच जे काही आमदार निवडून आलेले आहे, ते काठावर निवडून आलेले आहे. मी 5,700 मतांनी निवडून आल्याचे सांगत आदिती तटकरे यांच्या वक्तव्यावरुन पलटवार केला आहे. महायुती असताना सुद्धा राष्ट्रवादीने जो काही अपक्ष उमेदवार दिला, अश्या छुप्या पद्धतीने मला पडण्याचा प्रयत्न या मतदारसंघातून केला गेला. माझ मताधिक्य जे घटलेले आहे, ते पालकमंत्र्यांना सांगा, हे तुमच्या बापाचंच पाप आहे. माझ मताधिक्य तुमच्या बापामुळे घटलेले आहे, अशा शब्दात थोरवे यांनी आदिती तटकरेंवर पटलवार केला आहे. तसेच, मी काठावर निवडून आलेलो नाही असेही त्यांनी बजावले.
दरम्यान, खालापूर तालुक्यातील तांबाटी येथे एका नागरी सत्कारप्रसंगी पत्रकार परिषदेत कर्जत खालापूर मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार थोरवे यांनी आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे, महायुतीतील दोन आमदारांमध्ये चांगलीच बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. कर्जत-खालापूर मतदारसंघ हा रायगड जिल्ह्यात येतो, या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा आदिती तटकरे यांनी सांभाळली आहे. त्यामुळे, या जिल्ह्यात तटकरे कुटुंबीयांचा वेगळाच दबदबा पाहायला मिळतो. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि तटकरे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे.