politicalmaharashtra

अखेर दोन भावांचा संघर्ष मिटला, विजयासाठी बंधू प्रचाराच्या मैदानात

सातारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आता माण खटाव विधानसभा मतदारसंघातून (Man Khatav Assembly constituency) एक मोठी बातमी समोर येत आहे. अखेर माण खटावमध्ये दोन भावांमधला संघर्ष मिटला असून जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना निवडून आणण्यासाठी शेखर गोरे (Shekhar Gore) संपूर्ण ताकतीनिशी रिंगणात उतरले आहेत.

माण-खटाव विधानसभा मतदारसंघात साधारण पंधरा ते वीस वर्ष दोन भावांमधला संघर्ष वारंवार पाहायला मिळाला आहे. जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे असा हा संघर्ष आजपर्यंत या मतदारसंघानेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. परंतु या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आता जयकुमार गोरे यांना आमदार करण्यासाठी शेखर गोरे संपूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

शेखर गोरे जयकुमार गोरेंचा प्रचार करणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तिकीट नाकारल्यानंतर शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा शेखर गोरे यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी राजकीय भूमिका जाहीर केली नव्हती. परंतु कुळकजाई येथे मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत अखेर शेखर गोरे यांनी त्यांचे बंधू जयकुमार गोरे यांचे विधानसभेला काम करणार असल्याचे जाहीर केले. तसेच खटाव तालुक्यातून विरोधी उमेदवार प्रभाकर घाडगे यांनी एक जरी मत जास्त घेतले तरी शेखर गोरे राजकीय संन्यास घेईल, असेही शेखर गोरे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर अखेर आता शेखर गोरे यांच्यामुळे माण खटाव विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपची ताकद वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघात आता राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.

Related Articles

Back to top button