नाना पटोलेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा धक्का दिला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. काँग्रेसचा हा प्रस्ताव राज्यातील राजकीय वातावरण तापवणारा ठरला आहे.
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (१० मार्च) राज्याचा अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प मांडल्यानतंर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी झालेल्या खुर्च्यांच्या अदलाबदली आणि एकनाथ शिंदेंनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली. आता या विधानवरुन चर्चांना उधाण आलेले असताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एक मोठे विधान केले. नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, असे नाना पटोलेंनी म्हटले. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
नाना पटोले यांनी धुलिवंदनाच्या निमित्ताने नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नेत्यांना बुरा न मानो होली है म्हणत खास शैलीत शुभेच्छा दिल्या. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत त्यांची प्रकृती ठीक व्हावी, असे म्हटले. आजकाल ते खूप फेकतात त्यांनी मोदींप्रमाणे खोटं बोलू नये, असा सल्ला दिला. आधी जे देवेंद्र फडणवीस होते, राज्यासाठी त्यांची लढाई चालायची. ते त्यांनी करावं अश्या शुभेच्छा देतो”, असे नाना पटोले म्हणाले.
“तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काँग्रेससोबत येण्याची ऑफर देत त्यांची अवस्था फार वाईट आहे. पुढच्या काळात त्यांचा पक्ष टिकेल की नाही माहीत नाही. भाजप त्यांना जगू देत नाही. अजित पवार यांनी सादर केलेले बजेट त्यांच्या मनातील बजेट नाही. हे बजेट बिना-पैशाचे आहे”, असे नाना पटोलेंनी म्हटले.
“त्यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी ओढ”
“एकनाथ शिंदे यांची अवस्था फार वाईट झाली, त्यांच्या सगळ्या योजना बंद केल्या जात आहे. त्यांच्या लोकांची सुरक्षा काढली गेली. पण भाजपच्या लोकांची आहे. त्यामुळे त्यांनी त्यातून शिकावं. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यांनी आमच्यासोबत यावं, आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, आम्ही त्यांची काळजी घेऊ. त्याच्यात मुख्यमंत्री पदासाठी ओढ लागली आहे. आम्ही दोघांनाही काही दिवस मुख्यमंत्री बनवू. अजित पवार यांना काही दिवस आणि एकनाथ शिंदे यांना काही दिवस मुख्यमंत्री बनवू”, असे मोठे विधान नाना पटोलेंनी केले.
“सुपरफास्ट आहेत त्यांनी आणखी मोठं व्हावं”
“महाविकासआघाडीतील संजय राऊत यांना शुभेच्छा देत नाना पटोले म्हणाले, अति विद्वान व्यक्तीमत्त्व महाराष्ट्राला लाभलं आहे. ते वेगवान नेते असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. विजय वडेट्टीवार मोठे नेते आहेत. सुपरफास्ट आहेत त्यांनी आणखी मोठं व्हावं, सुसाट पळावे”, असेही नाना पटोले म्हणाले.