Friday, October 18, 2024
Homemaharashtraसांगोल्यात आघाडीत बिघाडी होणार? शेकापला जागा न मिळाल्यास लाल बावटा फडकवणार, अनिकेत...

सांगोल्यात आघाडीत बिघाडी होणार? शेकापला जागा न मिळाल्यास लाल बावटा फडकवणार, अनिकेत देशमुखांचा इशारा

महाविकास आघाडीकडून जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाने बार्शी सोबत सांगोल्याची जागाही मागितली आहे. गेल्यावेळी शिवसेनेचा आमदार असल्याने या जागेवर आमचा हक्क असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यामुळं महाविकास आघाडीला कायम साथ देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची जागा धोक्यात आल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. यातूनच आज डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी आपली भूमिका मांडताना सांगोला विधानसभा हा पहिल्यापासून शेकापचा बालेकिल्ला असल्याने महाविकास आघाडीतून ही जागा आम्हाला नक्की मिळेल असे सांगितले. मात्र जागा वाटपात काही फेरबदल झाल्यास मात्र शेकाप कार्यकर्ते शांत बसणार नसून तसेच झाल्यास शेकाप निवडणूक लढवणार असे संकेत त्यांनी दिले आहेत.

 

आता शेकाप आणि ठाकरे सेना यांचा निर्णय महाविकास आघाडीत कसा होणार? यावर पुढचे भवितव्य अवलंबून आहे. जर ही जागा ठाकरे गटाला गेल्यास येथून शेतकरी कामगार पक्ष पूर्ण ताकतीने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिलेले माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांचे नाव सध्या चर्चेत असून ही जागा ठाकरे गटाला सुटल्यास येथील उमेदवार दीपक साळुंखे असणार आहेत. यावरही डॉक्टर देशमुख यांनी टीकेची झोड उठवताना गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म न पाळता विरोधकांना मदत करणाऱ्या उमेदवाराला महाविकास आघाडी उमेदवारी देणार का? असा सवाल केला आहे. 

गेली 60 वर्ष शेकापचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या सांगोला विधानसभा मतदारसंघावर (Sangola assembly constituency) यावेळी महाविकास आघाडीमधून ठाकरे गटाने (Thackeray Group) दावा सांगितलाय. त्यामुळं आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. आघाडीत ही जागा शेकापला न मिळाल्यास आम्ही लाला बावटा फडकवणार असल्याची माहिती डॉ. अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh) यांनी दिली आहे. दिवंगत गणपतराव देशमुख यांनी तब्बल 55 वर्ष आमदारकी केलेल्या या विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळी केवळ 768 मताच्या फरकाने शिवसेनेचे शहाजीबापू पाटील विजयी झाले होते

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments