अकलूजसारखं सांगोल्याचाही विकास करतील; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडून सांगोलकरांच्या अपेक्षा
सांगोला, तालुका प्रतिनिधी : साहेब, आता आपण खासदार झालात. अकलूजसारखं सांगोल्याचाही विकास करा. तसंच सांगोला आपण निश्चितपणे बनवाल अशी अपेक्षा ठेवतो अशी भावना नुतन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडून सांगोलकर व्यक्त करु लागले आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात चर्चेत होता. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच महायुती व महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळते इथपासून निवडणुकीच्या निकालानंतरही हा लोकसभा मतदारसंघ चर्चेतच आहे. निवडणुकीपूर्वी झालेल्या राजकीय घडामोडीनंतर त्यातच महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघात लक्ष देऊनही ऐनवेळी शरदचंद्र पवार गटात गेलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजयी गुलालाची उधळण केली. या मतदारसंघातील निकालानंतर सध्या मतदानापूर्वी व मतदानानंतर विविध पक्षाच्या नेतेमंडळींनी,कार्यकर्त्यांनी केलेल्या कामांची चर्चा होत आहे. परंतु या चर्चेंबरोबरच सध्या नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ज्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात अकलूजचा (स्वतःच्या गावचा) विकास केला आहे तसा इतर तालुक्यांचाही विकास करावा अशी चर्चा होत आहे.
सांगोला तालुक्यातील नागरिकांनीही मोहिते पाटील यांनी अकलूजसारखाच आमचाही विकास करावा. तालुक्यातील मूलभूत, औद्योगिक व विशेषतः पाण्याविषयी समस्यांचे निराकरण करावे असे गाव कट्ट्यावर, हॉटेल्सवर चर्चा करीत असताना बोलत आहेत. टेंभू-म्हैसाळ योजना, नीरा उजवा कालव्याचे मिळणारे पाणी व माण नदीत पाणी सोडण्यासाठी नियोजनाची गरज आहे. या सर्व पाण्याचे नियोजन अगोदरपासून नियमित करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पाणी अडवणुकीच्या आरोपांना कृतीतूनच उत्तर द्यावे लागणार –
निवडणुकीपूर्वी झालेल्या प्रचारात मोहिते-पाटील यांच्यावर सांगोला तालुक्यातील पाणी अडवणुकीचा राजकीय आरोप विरोधकांकडून केला जात होता. तालुक्यातील निरा उजवा कालव्याच्या टेलला असणाऱ्या भागांना हक्काच्या पाण्यासाठी नेहमीच अन्याय होत आहे. तालुक्यातील या हक्काच्या नियमित पाण्याबाबत नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनाच सध्या लक्ष द्यावे लागणार आहे. अकलुजकरांनी पाणी अडवलेचा आरोप निवडणूकीत केला जात होता. सध्या तेच खासदार असल्यामुळे त्यांना आता कृतीतूनच हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.
याकडे प्रामुख्याने द्यावे लक्ष –
– तालुक्यातील हक्काच्या सर्व योजनांच्या पाण्याचे नियोजन करण्यात यावे
– सर्वसोयीयुक्त नवीन औद्योगिक वसाहत निर्माण करावी
– स्व. बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना (उजनी उपसा सिंचन येजना) पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न व्हावेत
– टेंभू – म्हैसाळ विस्तारातून सांगोला तालुक्याला मिळालेले पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न व्हावेत
– नवीन औद्योगिक प्रकल्प निर्मितीसाठी प्रयत्न करावे
– डाळिंबावर एखादा प्रक्रीया उद्योगासाठी प्रयत्न व्हावा
गट – तट संपले, आता तालुक्याच्या विकासावर बोला –
निवडणुकीविषयी राजकीय चर्चा होत असताना कोणत्या पक्षातील कोणत्या नेत्यांनी कसे काम केले, कोणी बाहेरून-आतून कशी मदत केली, कोणत्या नेत्यांनी कोणाला पुढे करुन कोणाचे कसे काम करून घेतले यावर जोरदार चर्चा सुरू असते. परंतु चर्चेच्या शेवटी मात्र आता निवडणूक संपली आता गट-तट सगळं विसरा अन तालुक्याच्या विकासावर चर्चा करा असे काही जण आवर्जून बोलत असतात. अशीच सकारात्मक चर्चा मतभेद विसरून विकासासाठी झाली पाहिजे असा उपदेशाचा डोसही शेवटी दिला जातो