आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक संपन्न
सांगोला:-आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे उन्हाळ्याच्या प्रारंभीच माण नदीला पाणी आल्याने शेतकरी सुखावला आहे. सध्या टेंभूचे आवर्तन सुरू असून पिण्याच्या पाण्यासाठी, पशुधनासाठी टेंभू योजनेतून माण नदीवरील सर्व बंधारे त्वरित भरून द्यावेत असे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले असल्याची माहिती आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दिली.
टेंभू योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचे नियोजन करण्यासाठी मुंबई येथे जलसंपदा मंत्री मा.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत मंगळवार दिनांक ४ मार्च रोजी बैठक पार पडली. यावेळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह प्रशासनाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
ऐन उन्हाळ्यात माण नदीला पाणी आल्याने शेतकरी सुखावला होता. सध्या टेंभूचे आवर्तन सुरू आहे. खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा, शेतीचा पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार बाबासाहेब देशमुख यांचा पाठपुरावा सुरू असून पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही पाणी सोडण्याची आक्रमक मागणी केलेली होती.
खवासपूर ते मेथवडेपर्यंतचे सर्व बंधारे पुरेशा पाण्याने भरून द्यावेत. टेंभूच्या आवर्तनाचे पाणी सर्व गावांना व्यवस्थित देऊन माण नदीवरील सर्व बंधारे त्वरित भरून द्यावेत त्याचप्रमाणे पाणी आवर्तनात होणारी पाणीगळती टाळण्याच्या दृष्टीनेही जलसंपदा विभागाने उपायोजना कराव्यात., अशा सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री ( गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या असल्याची माहिती आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दिली.