टीईटी आणि गायरान भूखंड घोटाळ्याप्रकरणी राज्यातील शिंदे सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोधकांनी धारेवर धरले आहे. नुकताच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले. या अधिवेशनात या घोटाळ्यांप्रकरणी विरोधकांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मात्र, याप्रकरणी आता सत्तार यांनी स्वत:च्याच पक्षातील म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेत्यावर आरोप केले आहेत. नाव न घेता संबंधित नेत्यावर सत्तार यांनी आरोप केले आहेत.
यावेळी त्यांनी माझ्याच पक्षातील नेत्याने माझ्याविरोधात कट रचल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात सत्तार यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप सत्तार यांनी केला आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे.
यात काही माझ्या पक्षातील असू शकतात तर काही माझे हितचिंतक आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणेतरी बाहेर बातम्या पुरवत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला आहे.
तर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरु आहे, असा गौप्यस्पोट सत्तार यांनी केला. सत्तार यांच्या या विधानाने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.