भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा सामना आज शेर ए बांगला स्टेडियमवर खेळवला जात आहे. यातील दुसऱ्याच षटकात टीम इंडियाला धक्का बसला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला चेंडू लागला आहे. त्यामुळे त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले. दुखापत गंभीर असल्याचे दिसून येत आहे. मैदानातून परतत असताना त्याच्या अंगठ्यातून रक्त येत होते.
हा सर्व प्रकार दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर घडला. मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर अनामूल हकने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला, तिथे रोहित फिल्डिंगसाठी तयार होता. मात्र, चेंडू त्याच्या अपेक्षेपेक्षा खूपच खाली होता.
त्यामुळे त्याने हात चेंडूच्या खालच्या दिशेने पुढे केले, तेवढ्यात चेंडू त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला लागला. अशाप्रकारे रोहित झेलही पकडू शकला नाही आणि त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ झालेल्या हाताला धरून तो लगेच मैदानातून निघून गेला. रोहितला एक्स-रेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.