अल कायदा दहशतवादी संघटनेने भारताविरोधात नव्या जिहादचा मॉड्यूल रचण्याची तयारी केली आहे. यात तरुणांना जोडण्यासाठी अल कायदाशी संबंधित संघटना इस्लामिक ट्रान्सलेशन सेंटरने (आयटीसी) नवा प्लॅन आखला आहे. आयटीसीच्या वेब पोर्टलने मुस्लीम तरुणांना जिहादी मीडियामध्ये सामील होण्याचे आवाहन करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टनंतर आता गुप्तचर यंत्रणा तसेच पोलिस आणि इतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गृहमंत्रालयाच्या माहितीनंतर पोलिसांच्या विशेष शाखेने सर्व जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. विशेष शाखेने पाठवलेल्या अलर्टमध्ये आयटीसी वेब पोर्टलने शेअर केलेल्या पोस्टचाही उल्लेख करण्यात आला आहे.
यामध्ये मुस्लीम तरुण आणि महिलांना जिहादी मीडियामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयटीसीच्या वेब पोर्टलने मुस्लीम तरुणांसाठी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, उत्तम संधी, प्रिय मुस्लीम बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला जिहादी मीडियाच्या कामात रस आहे का? आम्हाला भाषांतरकारांची गरज आहे, तुम्ही कोणत्याही भाषेत काम करु शकता.या मुजाहिद उलेमा आणि उमरस यांच्या लेखांचा अनुवाद करण्यासाठी आमच्या मोहिमेत सामील व्हा. जिहादी माध्यमांमध्ये सेवा करण्याची ही उत्तम संधी आहे. तुमच्या आजूबाजूच्या बंधू- भगिनींनाही या कामाचा फायदा करुन घ्या.