Sunday, October 6, 2024
Homesportsब्रेकिंग! अखेरच्या चेंडूवर भारताचा बांगलादेशवर थरारक विजय

ब्रेकिंग! अखेरच्या चेंडूवर भारताचा बांगलादेशवर थरारक विजय

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 विश्वचषकात आज भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या भारतीय संघाने संथ सुरुवातीनंतर केएल राहुल, विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांच्या शानदार खेळाच्या जोरावर बांगलादेश समोर विजयासाठी 185 धावांचे लक्ष्य ठेवलेले.
बांगलादेशच्या डावाच्या दरम्यान पावसाने हजेरी लावल्यानंतर बदललेल्या समीकरणानंतरही गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारतीय संघाला 5 धावांनी विजय मिळवून दिला.
या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीतील आपली जागा जवळपास पक्की केली आहे. उपांत्य दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा केवळ 2 धावा करू शकला.
या विश्वचषकात आतापर्यंत अपयशी ठरलेल्या केएल राहुलने या सामन्यात तुफान कामगिरी केली. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेत 32 चेंडूवर 50 धावा केल्या. सूर्यकुमारने केवळ 16 चेंडूंवर 30 धावांचा तडाखा दिला. अनुभवी विराट कोहलीने अखेरपर्यंत नाबाद राहत 44 चेंडूवर 64 धावा करत संघाला 184 पर्यंत मजल मारून दिली.
भारतीय संघाने दिलेल्या 185 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशसाठी लिटन दास व शांतो यांनी आक्रमक सलामी देताना 7 षटकात 66 धावा चोपल्या.
दासने केवळ 21 चेंडूंवर अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर आलेल्या पावसामुळे जवळपास अर्ध्या तासांपेक्षा जास्त वेळेचा खेळ वाया गेला. पाऊस थांबल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार, बांगलादेश समोर विजयासाठी 16 षटकात 151 धावांचे आव्हान देण्यात आले.
अर्धशतक करून खेळत असलेल्या दास याला पावसानंतरच्या पहिल्याच षटकात केएल राहुलने थेट फेक करत धावबाद केले.
त्यानंतर बांगलादेशचा डाव पत्त्याच्या डावाप्रमाणे कोसळला. शमीने शांतोला बाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. या स्पर्धेत आत्तापर्यंत भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज राहिलेल्या अर्शदीपने बांगलादेशचा कर्णधार शाकीब व उपकर्णधार अफीफ यांना एकाच षटकात बाद करत बांगलादेशच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावला. तळाच्या फलंदाजांना मोक्याच्या क्षणी मोठे फटके न खेळू देता भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 145 धावांवर रोखत संघाला विजय मिळवून दिला.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments