सध्या सीमाभागाप्रश्नी महाराष्ट्राचे वातावरण तापले आहे. अशातच कर्नाटकाच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्रातील मंत्री आणि समन्वय समितीच्या नेत्यांना बेळगाव दौऱ्यावर येऊ नये, असे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवले आहे. यावर सीमाप्रश्न समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
सध्या परिस्थिती तणावपूर्ण असताना कर्नाटकाने अशा स्वरूपाचे पत्र पाठवले आहे. कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी बेळगावला येऊ नये, असे पत्राद्वारे कळविले असले तरी मी बेळगावला जाणारच आहे. बेळगावचा नियोजित दौरा सीमाभागातील मराठी बांधवांच्या भावना जाणून घेण्यासाठी आहे. यामागे चिथावणीखोर भाषण करणे किंवा भावना भडकावण्यासाठी नाही. सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना आणि त्यांचे स्पष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
कर्नाटक सरकारच्या पत्रासंदर्भात माध्यमांनी पाटील यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, आमच्या बेळगाव दौऱ्याला अडचण निर्माण करण्याचे प्रयत्न कर्नाटक सरकारकडून चालवले जात आहे.
मात्र, आम्ही तिथे जाऊन कोणत्या स्वरूपाचे चिथावणीखोर विधान किंवा भाषण करणार नाही. आम्ही केवळ तेथील मराठी बांधवांच्या भावना ऐकण्यासाठी जाणार आहोत. त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.