सुर्यकुमार यादव याचा यंदाचा धावांचा तडाखा विलक्षण आहे. सातत्याने आणि भारदस्त स्ट्राईक रेटने तो धावा जमवतोय आणि गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतो. यंदा २८ सामन्यांत त्याने एक शतक आणि नऊ अर्धशतकी खेळी केल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिेकेटच्या आपल्या केवळ दुसऱ्याच मोसमात त्याने टी-२० इंटरनॅशनलमध्ये एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये हा टप्पा ओलांडणारा तो केवळ पहिलाच भारतीय आहे. त्याच्याआधी टी-२० इंटरनॅशनलमध्ये एकाच वर्षात एक हजाराच्यावर धावा फक्त पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान ह्यानेच केलेल्या आहेत.
रिझवान ह्याने गेल्या वर्षी २९ सामन्यात १३२६ धावा केल्या होत्या. सुर्यकुमार यादवच्या यंदा आतापर्यंत २८ सामन्यात १०२६ धावा असून ज्याप्रमाणे रिझवानला फलंदाजीच्या क्रमवारीत त्याने प्रथम स्थानाहून पायउतार केले तसेच धावांच्याबाबतीतही तो यंदा त्याला मागे टाकेल, अशी चिन्हे आहेत.